Wednesday 4 May 2011

Karad History.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्री पर्वताची उत्तर-दक्षिण अशी रांग आहे. खुद्द कराड शहरा पासून या पर्वताच्या रांगा फार दूर नाहीत. सातार्यासारखे अगदी डोंगराच्या कुशीत नाही, पण कराडच्या भोवती निदान तीन दिशांना डोंगर आहेत. पूर्वेला सदाशिवगड हा शिवाजी महाराजांनी वसवलेला किल्ला, दक्षिणेला आगाशिवाची प्राचीन लेणी असलेला डोंगर तर पश्चिमेला समर्थ रामदास स्वामींच्या निवासाने पावन झालेला चंद्रगिरीचा डोंगर आहे. पुण्याहून सातारा जिल्ह्याच्या अगदी मधून जाणारा प्रचंड रहदारीचा राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक ४ हा कराडला थोडेसे डावीकडे ठेऊन दक्षिणेला बंगळूर कडे जातो. 
प्राचीन काळापासून कराड हे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. याचे कारण महाबळेश्वरला उगम पावून दक्षिणेला जाणार्या कृष्णा व कोयना या नद्यांचा कराडला होणारा संगम हे होय. हा संगम नेहमी प्रमाणे नाही. कराडला वायव्येकडून वाहत येणारी कृष्णा नदी हि कराड जवळ एकदम पूर्णपणे दक्षिण वाहिनी होते. तर पश्चिमेकडून प्रवास करत येणारी कोयना कराड जवळ एकदम उत्तर वाहिनी होते. आणि या दोन्ही बहिणी समोरा समोर कराडलाच एकमेकांना आलिंगन देतात, हाच तो प्रीती संगम. "कृष्णा मिळाली कोयने प्रती सखे ग सुंदर संगम किती". अशी काव्ये यावर लिहिली जातात. असा समोरा समोर होणारा नद्यांचा संगम विरळा असतो. दक्षिणोत्तर आलेल्या या नद्यांचा संगम झाल्यावर एक झालेली नदी कृष्णा नावाने पूर्वेकडे जाते. व कृष्णा नावानेच बंगालच्या उपसागरात मिळते. या संगमामुळे कराड शहराच्या पश्चिमेला कोयना व उत्तरेला कृष्णा अश्या नद्या आहेत. 
शिलाहारांच्या शाखेतील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे विजयादित्त्य होय ( इ.स. ११४२-११५४). हा राजा मोठा लक्ष्मि भक्त होता म्हणून कराडला देखील त्याने एक अतिशय भव्य लक्ष्मी मंदिर बांधले. त्याचा चौथरा आजही निमजग्याच्या माळावर दिसतो. या देवळातील लक्ष्मी मूर्ती कशी होती? तर ती सुवर्ण तेजाची सोळा हातांची होती. या मंदिरात अनेक कोनाडे असून त्यात अनेक मूर्ती होत्या. त्यातील एक म्हणजे कराडच्या सोमवारपेठेच्या भैरोबा गल्लीतील उत्तरालाक्ष्मीची मूर्ती. हि मूर्ती इतकी सुंदर आहे कि त्यावरून मुळची लक्ष्मीची मूर्ती किती भव्य व सुंदर असेल याची कल्पनाच केलेली बरी. कराडला शक्तीक्षेत्र, मुक्तिक्षेत्र व सुवर्णकर क्षेत्र असे संबोधिले जात होते.
(सन्दर्भ - प्रा. देशपांडे)

No comments:

Post a Comment